वडापुरी-काटी गटात ‘श्रीमंत’ परिवर्तन; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्रीमंत ढोले सरांचा उमेदवारी अर्ज दाखल

सहसंपादक महेश पांडवे 9511875416
इंदापूर.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत वडापुरी-काटी गटात आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत ढोले सर यांनी आज मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत शक्तीप्रदर्शन केले.
कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह
अर्ज दाखल करण्यापूर्वी ढोले सर यांनी ग्रामदैवताचे दर्शन घेतले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात ‘राष्ट्रवादी पुन्हा’ अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली. वडापुरी-काटी गटातील विविध गावांमधून आलेले कार्यकर्ते, समर्थक आणि पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीमंत ढोले सर यांची ओळख एक अभ्यासू, संयमी आणि दांडगा जनसंपर्क असलेले व्यक्तिमत्व म्हणून आहे. ते सर्वपरिचित असून, शिक्षण संस्थाआणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये त्यांना मानला जाणारा वर्ग मोठा आहे. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवून अधिकृत उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीमंत ढोले सर म्हणाले की, “वडापुरी-काटी गटातील रस्ते, पाणी, शिक्षण आणि शेतीचे प्रश्न सोडवणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. पक्षाची विचारधारा आणि विकासाची दृष्टी घेऊन मी जनतेसमोर जात आहे. या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनता मला नक्कीच आशीर्वाद देईल.”







