इंदापुरात राजकीय भूकंप? दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या युतीची चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम!

सहसंपादक महेश पांडवे 9511875416
इंदापूर:
राज्याच्या राजकारणात ‘काटे की टक्कर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदापूर तालुक्यात आता एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे
गेल्या अनेक दशकांपासून इंदापूरच्या राजकारणात पाटील आणि भरणे हे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत आणि जिल्हयातील वरिष्ठ नेत्यांच्या समीकरणांमुळे ही दोन्ही शकले एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सत्ता संघर्ष: जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही गटांना एकमेकांच्या सोयीची भूमिका घेणे फायदेशीर ठरू शकते.
वरिष्ठ पातळीवरील हालचाली: महायुती किंवा महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या गणितांमुळे या दोन्ही नेत्यांना स्थानिक पातळीवर ‘तडजोड’ करावी लागण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांची ‘धोक्याची’ घंटा
या संभाव्य युतीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे एकमेकांविरुद्ध संघर्ष केला, गुन्हे अंगावर घेतले आणि टोकाचा प्रचार केला, ते आता अचानक एकत्र कसे येणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
”आम्ही आयुष्यभर ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबतच आता प्रचार करायचा का? नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा निवडणुकीत याचे पडसाद उमटतील,” अशी भावना एका स्थानिक कट्टर कार्यकर्त्याने व्यक्त केली आहे.







