सोलापूर भाजपा पूर्व जिल्हा कार्यकारिणी जाहीर विकास वाघमारे यांना पुन्हा जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी…
सोलापूर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनीअखेर सोलापूर पूर्व जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली

दादासाहेब जगताप संपादक पश्चिम महाराष्ट्र
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून या कार्यकारिणीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्हा सरचिटणीस पदावर मोहोळचे तरुण आणि उत्साही नेते विकास वाघमारे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर अक्कलकोटमधील प्रदीप पाटील आणि मंगळवेढ्यातील संतोष मोगले या नव्या चेहऱ्यांनाही सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
या कार्यकारिणीत ९ उपाध्यक्ष, ८ चिटणीस, १ कोशाध्यक्ष आणि ६२ सदस्यांना स्थान देण्यात आले आहे.
तसेच, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटचे महेश बिराजदार आणि ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे विनायक सुतार यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीला आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. माजी जिल्हाध्यक्ष आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या कार्यकाळात सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळलेले विकास वाघमारे हेच एकमेव पुन्हा नियुक्त झालेले पदाधिकारी आहेत, हे विशेष लक्षवेधी आहे.
या कार्यक्रमास आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तसेच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार उपस्थित होते.







