संग्रामनगर-माळशिरस रोडवर स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी; १५ दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास भाजपचा आंदोलनाचा इशारा

माळशिरस तालुका प्रतिनिधी सचिन उगाडे
माळशिरस:
संग्रामनगर ते माळशिरस रस्त्यावरील वाढती वाहतूक आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी त्वरित स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांच्या आत ही मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अपघातांचे सत्र आणि नागरिकांची सुरक्षा धोक्यात
संग्रामनगर ते माळशिरस या रोडवर सध्या वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. या परिसरात नामांकित हॉस्पिटल्स, शाळा तसेच लहान-मोठे अनेक व्यावसायिक आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि ग्राहक यांची नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र, वाहनांच्या वाढत्या वेगामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे, ज्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता येथे गतिरोधक असणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSRDC. प्रशासनाला निवेदन देतेवेळी अकलूज भारतीय जनता पार्टीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
सुधीर जाधव
विक्रम गायकवाड
संतोष वाघमोडे
अमोल माने
अमर शेख
माळशिरस शहराध्यक्ष धाईंजे
रोहन फुले
गणेश काळे
तेजस उबाळे
या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर पुढील १५ दिवसांत या ठिकाणी योग्य उपाययोजना करून स्पीड ब्रेकर बसवले नाहीत, तर भाजप लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, ज्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल.






