उजनी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक; कालव्यांना तातडीने पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची जोरदार मागणी
खरीप पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा

महाराष्ट्र कार्यकारी संपादक दादासाहेब जगताप
अंकोली,
भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचत असून, येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उजनी धरणाच्या कालव्यांना (कॅनल) तातडीने पाणी सोडण्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
सध्या मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर तसेच उजनी कालव्याच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये ऊस पिकाला पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस तोंडात आला असून, वेळेत पाणी न मिळाल्यास वजनात घट होऊन आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
याशिवाय डाळिंब, द्राक्ष, लिंबू, आंबा, पेरू यांसारख्या फळबागाही पाण्याअभावी धोक्यात आल्या आहेत. मोठा खर्च करून उभारलेल्या बागांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर झाडांचे नुकसान होण्याबरोबरच उत्पादनात मोठी घट होईल. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
उजनी धरणात सध्या चांगला पाणीसाठा असून वरच्या धरणांतून आणि भीमा नदीतून सातत्याने पाणी येत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून सिंचनासाठी कालव्यांना पाणी सोडणे ही काळाची गरज असल्याचे कृषी तज्ज्ञही सांगत आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने आणि जलसंपदा विभागाने तातडीने लक्ष देऊन उजनी धरणाच्या कॅनलला पाणी सोडावे, जेणेकरून उसाचे पीक, फळबागा आणि खरीप हंगामातील पिके वाचतील. वेळेत पाणीउपलब्ध झाल्यास हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि आगामीउत्पादनातही वाढ होईल.
शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही शासनाकडे याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने विलंब न करता कालवे सुरू करावेत व सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी सोडावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उजनी धरणाच्या कॅनलला तातडीने पाणी सोडण्यात यावे.
ऊस, फळबागा आणि खरीप पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
जलसंपदा विभागाने पाणी नियोजन करून लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्यावी.






