सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि., कुमठे येथे १९ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

दादासाहेब जगताप कार्यकारी संपादक पश्चिम महाराष्ट्र
कुमटे.
कर्मचाऱ्यांचे योगदान हेच कारखान्याच्या प्रगतीचे खरे बळ” चेअरमन पुष्पराज काडादी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि., कुमठे, सोलापूर येथे अनेक वर्षे निष्ठा, प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि समर्पणभावनेने सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या १९ कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. कारखान्याच्या सिद्धेश्वर हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास कारखान्याचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे प्रेरणास्थान असलेल्या आप्पांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री. केन मॅनेजर काशिनाथ पाटील साहेब यांच्या हस्ते आप्पांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट करण्यात आली होती. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणारे फलक, स्वागत बॅनर तसेच छायाचित्रांमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली होती. उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल अभिमान आणि भावनिक जिव्हाळा स्पष्टपणे दिसून येत होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन श्री. पुष्पराज काडादी हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,
“कारखान्याच्या प्रगतीमागे कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम, शिस्तबद्ध कार्यपद्धती, प्रामाणिक सेवा आणि संस्थेविषयीची निष्ठा हेच खरे बळ आहे. कोणत्याही संस्थेची खरी ताकद तिचे कर्मचारी असतात. आज सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आयुष्यभर संस्थेची सेवा केली. त्यांनी कारखान्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले असून त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.”
त्यांच्या भाषणास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांविषयीच्या भावना व्यक्त करताना भावनिक वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री. धर्मराज काडादी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “कारखान्याच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर कर्मचाऱ्यांनी निस्वार्थ भावनेने काम केले. अनेक संकटे, आर्थिक अडचणी आणि बदलत्या परिस्थितीतही कर्मचाऱ्यांनी संस्थेची साथ सोडली नाही. आज त्यांचा गौरव करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”कार्यक्रमात कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. समीर सलगर साहेब यांनी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की,कारखान्याच्या उभारणीपासून ते प्रगतीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कर्मचाऱ्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. उत्पादन वाढ, प्रशासन, तांत्रिक कामे आणि विविध विभागांच्या कार्यक्षमतेमध्ये या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. अनेक संकटांमध्येही त्यांनी प्रामाणिकपणे सेवा दिली. त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.”

यावेळी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रत्येक कर्मचाऱ्याचा सन्मान होत असताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता. काही कर्मचारी आपल्या दीर्घ सेवाकाळाच्या आठवणी सांगताना भावूक झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान दिसून येत होता.
