अकलूजचा श्वास कधी मोकळा होणार? कत्तलखान्यांवरील कारवाईनंतर अतिक्रमण मोहिमेकडे अकलूजकरांचे लक्ष!

सहसंपादक महेश पांडवे 9511875416
अकलूज.
येथील नगरपरिषदेने अतिक्रमण विभागामार्फत शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर रीतसर नोटीस बजावून बुलडोझर फिरवत ते उद्ध्वस्त केल्यापासून संपूर्ण शहरात आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. नगरपरिषदेच्या या धडक कारवाईचे अनेकांनी स्वागत केले असले, तरी आता या निमित्ताने अकलूजमधील मुख्य रस्ते आणि चौकांमधील इतर अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “कत्तलखाने हटवले, मग शहरातील इतर भागांतील अतिक्रमणे कधी निघणार?” असा थेट सवाल आता सामान्य अकलूजकरांमधून विचारला जात आहे.
’अकलूजचा श्वास कोंडलाय’; मुख्य चौकांची दुरवस्था
सध्या अकलूजमधील अनेक प्रमुख चौक आणि मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा असलेली दुकाने, अनधिकृत टपऱ्या आणि वाढलेले पार्किंग यामुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले असून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. कत्तलखान्यांवर कारवाई करून नगरपरिषदेने इच्छाशक्ती दाखवली असली, तरी संपूर्ण अकलूजचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी ही मोहीम व्यापक स्तरावर राबवण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा आणि सवाल
या धडक कारवाईनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, नागरिकांमधून खालीलप्रमाणे संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत:
कारवाईत दुजाभाव होणार का? एका विशिष्ट भागातील किंवा स्वरूपातील अतिक्रमण हटवून नगरपरिषद इतर धनदांडग्या किंवा राजकीय वरदहस्त असलेल्या अतिक्रमणधारकांना अभय देणार का?
नगरपरिषद अन्याय करणार का? जर कारवाई करायचीच असेल, तर ती सरसकट आणि कायदेशीर मार्गाने सर्वच अतिक्रमणांवर झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.
मुख्याधिकारी दबावाखाली आहेत का? कत्तलखान्यांवरील घाईघाईने झालेल्या कारवाईमागे नक्की कोणाचा राजकीय दबाव होता? नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत? अशीही जोरदार चर्चा आता चौकाचौकांत रंगू लागली आहे.
नागरिकांची मागणी:
“अतिक्रमण विभागाची कारवाई स्वागतार्ह आहे, पण ती एकांगी नसावी. अकलूज शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यावरील आणि चौकातील बेकायदेशीर बांधकामे व टपऱ्या हटवून प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता अकलूजकरांना मोकळा श्वास घेता येईल असे वातावरण तयार करावे.”
प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
कत्तलखान्यांवरील बुलडोझर कारवाईनंतर निर्माण झालेला रोष आणि वाढत्या अपेक्षा पाहता, नगरपरिषद प्रशासन आणि मुख्याधिकारी आता पुढील पाऊल काय उचलतात, याकडे संपूर्ण अकलूज तालुक्याचे लक्ष लागले आहे. शहराचा विकास आणि सुशोभीकरण करायचे असेल, तर सर्वच भागांतील अतिक्रमणांवर ‘बुलडोझर’ फिरणार की ही कारवाई केवळ एका विशिष्ट घटनेपुरतीच मर्यादित राहणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.






