अनंतराव पवार विद्यालय (निर निमगाव) येथे वीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सोहळा संपन्न
जुने स्नेहबंध नव्याने जुळले; 'कर्तव्य फाऊंडेशन'ची स्थापना

प्रतिनिधी: अरुण जाधव
निर निमगाव: येथील अनंतराव पवार विद्यालयातील २००५-०६ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा प्रथमच स्नेहसंमेलन कार्यक्रम (२५ ऑक्टोबर २०२५) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल वीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जुन्या मित्र-मैत्रिणींना आणि शिक्षकांना भेटण्याचा आनंद माजी विद्यार्थ्यांनी मनसोक्त लुटला.या स्नेहसंमेलनानिमित्त माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकमेकांची भेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. शालेय जीवनातील शिक्षण काळातील क्षण आठवून उपस्थितांचे डोळे आनंदाने व भावुकतेने पाणावले. इतक्या वर्षांनी भेटल्याने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. जुन्या मैत्रीच्या नात्यांना नव्याने जोडणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

या स्नेहसंमेलन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. जे. गरगडे सर होते. तसेच सहशिक्षक मुलानी सर, डोंबे सर, गोरे सर, सौ. मकर मॅडम, घोगरे सर, पिसे सर, संतोष सर, सावळकर सर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. विशेष म्हणजे, या माजी विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षकांनाच नव्हे, तर शाळेतील शिपाई वनवे मामा, मरळे मामा, तात्या मामा यांनाही कार्यक्रमासाठी निमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान केला.
हा कार्यक्रम केवळ जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नव्हता, तर या माजी विद्यार्थ्यांनी दूरदृष्टी ठेवत आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजकार्य करण्यासाठी ‘कर्तव्य फाऊंडेशन’ची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजात असणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही माजी विद्यार्थ्यांनी दिली. या स्तुत्य निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत करत माजी विद्यार्थ्यांना शाब्बासकीची थाप दिली.
कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनाच्या खेळांचा आस्वाद घेतला, आपले मनोगत व्यक्त केले आणि जुन्या गप्पागोष्टींमध्ये रमून गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर डुकरे व चैतन्य गरगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपक दोरकर यांनी केले.
२५ ऑक्टोबर २०२५ हा दिवस अनंतराव पवार विद्यालयाच्या २००५-०६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय दिवस ठरला.



