१९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘दहावी ड’ चा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न

सह संपादक… महेश पांडवे
अकलूज: १९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील दहावी ‘ड’ (२००६-२००७ बॅच) च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकमेकांची भेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा सोहळा जुन्या मैत्रीच्या नात्यांना नव्याने जोडणारा ठरला.विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील शिक्षणकाळातील क्षण आठवून सर्वांचे डोळे आनंदाने आणि भावूकतेने पाणावले होते. तब्बल १९ वर्षांनी भेटल्याने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.

या स्नेहसंमेलन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक अंकुश चव्हाण सर हे होते. त्यांच्यासह निंबाळकर सर, विद्यमान मुख्याध्यापक अमोल फुले सर, तसेच माजी वर्गशिक्षक सावंत सर, राजमाने सर, मुलाणी सर, ताटे देशमुख सर, माने देशमुख सर, भोसले सर, गव्हाणे सर, जाधव सर आदी सहशिक्षक प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे केली, तसेच स्पर्धात्मक उपक्रम घेण्यात आले. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या शिक्षकांचा सन्मान केला आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम आनंद, हास्यविनोद आणि जुन्या मैत्रीच्या गप्पांनी बहरून गेला होता.