रयत शिक्षण संस्थेच्या सोलापूर विभागीय समिती समन्वयक पदी प्रा. सुरेश (तात्या) पवार यांची निवड

कार्यकारी संपादक. पश्चिम महाराष्ट्र दादासाहेब जगताप
पंढरपूर (प्रतिनिधी):
रयत शिक्षण संस्था, सातारा या आशिया खंडातील सर्वात मोठ्या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या सोलापूर जिल्हा जुनिअर कॉलेज विभागीय समितीच्या समन्वयक (को-ऑर्डिनेटर) पदी प्रा. सुरेश तात्या पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल पंढरपूर तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या (जुनिअर कॉलेज) कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विभागीय समितीची पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये प्रा. सुरेश पवार यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक अनुभवाची आणि संस्थेप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेऊन त्यांच्याकडे या समन्वयक पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रा. सुरेश पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील रयतच्या सर्व जुनिअर कॉलेजेसच्या अंतर्गत प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीनंतर प्रा. सुरेश पवार यांनी संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे तसेच सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. “कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन, ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहचवणे आणि जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा दर्जा अधिक उंचावणे, यासाठी मी कटिबद्ध राहीन,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
त्यांच्या या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रा.वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि पंढरपूर तालुक्यातील ग्रामस्थांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







