अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई! ऊसाच्या शेतात गांजाची लागवड; तब्बल ₹१ कोटी ५ लाख ५५ हजारांचा गांजा जप्त!

कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप मो.८०५५६५१३००
अक्कलकोट .दक्षिण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत मौजे आळगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे मोठी धडक कारवाई केली. शेतातील ऊसाच्या पिकामध्ये गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याचे आढळून आले असून पोलिसांनी एकूण २४० गांजाची झाडे जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१० जिवंत गांजाची झाडे आणि ३० वाळलेली गांजाची झाडे आढळून आली. सदर झाडांचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम इतके असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹१ कोटी ५ लाख ५५ हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे विशेष पथक करजगी दुरक्षेत्र परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत आळगी येथील एका शेतात ऊसाच्या पिकामध्ये गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याची माहिती मिळाली.
ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांना कळविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित शेताची पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी अंदाजे १२ फूट उंचीची गांजा सदृश्य झाडे आढळून आली.आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी उर्फ बिराजदार, वय ६० वर्षे, रा. शेगाव, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर यांच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३१/२०२६ नुसार अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.
पोलिस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोसई राजशेखर निंबाळे यांच्यासह अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.







