सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: सराईत दुचाकी चोरटा गजाआड, ७ लाख ७० हजारांच्या २२ मोटार सायकली जप्त.

कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप मो.८०५५६५१३००
सोलापूर. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका सराईत मोटार सायकल चोराला अटक करून त्याच्याकडून ७,७०,००० रुपये किमतीच्या एकूण २२ मोटार सायकली जप्त केल्या आहेत.गुप्त माहितीच्या आधारे सापळापोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप व त्यांच्या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढण्यास सुरुवात केली.
या दरम्यान पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे व त्यांच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत चोरटा नामदेव बबन चुनाडी (रा. अनिल नगर, पंढरपूर, मूळ रा. नातेपुते) हा मोहोळ परिसरामध्ये चोरीची मोटार सायकल विक्री करण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहोळ येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.अशी उघडकीस आली चोरीचीसाखळी
पोलिसांनी संशयित नामदेव चुनाडी याच्याकडे असलेल्या मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने ती मोटार सायकल मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली.अधिक तपासात त्याने सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांतील विविध ठिकाणांहून अनेक मोटार सायकली चोरल्याचे मान्य केले. चोरलेल्या सायकलींपैकी काही सायकली त्याने त्याचे साथीदार( गणेश उर्फ नाना साबळे (रा. राऊत नगर, अकलूज) आणि तुषार चव्हाण (रा. राऊत नगर, अकलूज) यांच्या मदतीने लोकांना विकल्याचे सांगितले.
२२ गुन्हे उघडकीस
पोलिसांनी आरोपीकडून ७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या एकूण २२ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीणमधील मोहोळ, अक्कलकोट उत्तर, टेंभुर्णी; सोलापूर शहरातील जोडभावी पेठ; पुणे ग्रामीणमधील बारामती, सासवड, शिक्रापूर; पुणे शहरातील वाघोली, पौड, बावधन; तसेच अहमदनगर, सांगली, सातारा, नाशिक येथील एकूण २२ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाहन चोरांचे धाबे दणाणले आहेत.







