प्रशासनाचे दुर्लक्ष; अखेर युवकांच्या पुढाकारातून स्मशानभूमीचा श्वास मोकळा!
सर्व जोशी समाजाच्या युवकांच्या संकल्पनेतून

संपादक सुनील निकम 7038353599
निर निमगाव (प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाने ‘हागणदारी मुक्त गाव’ योजनेचा मोठा गाजावाजा केला असला, तरी ग्रांमपंचायतीच्या उदासीनतेमुळे ही योजना केवळ कागदावरच आहे की काय, असा संतप्त सवाल निर निमगाव येथे उपस्थित केला जात आहे. गावाची शान आणि पावित्र राखण्याऐवजी, येथील स्मशानभूमी परिसराची झालेली दुरवस्था आणि पसरलेली दुर्गंधी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. अखेर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाला कंटाळून जोशी समाजातील युवकांनी एकत्र येत श्रमदानातून हा परिसर चकाचक केला आहे.
दुर्गंधीचे साम्राज्य आणि
निर निमगाव येथील स्मशानभूमी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना उभे राहणेही कठीण झाले होते. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आणि विशेषतः जोशी समाजाच्या वतीने वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.

युवकांचे ‘स्वच्छता’ मिशन
प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता, जोशी समाजातील युवकांनी एकत्र येऊन हा प्रश्न हाताशी घेण्याचे ठरवले. रविवारी सकाळपासूनच युवकांनी हातात झाडू, फावडे आणि घमेले घेऊन संपूर्ण स्मशानभूमी परिसराची स्वच्छता केली. साचलेला कचरा, वाढलेली झाडेझुडपे आणि अस्वच्छता दूर करून हा परिसर स्वच्छ करण्यात आला.
”आम्ही वारंवार ग्रामपंचायतीला विनंती केली, पण दखल घेतली गेली नाही. शेवटी आपल्या गावाची आणि समाजाची जबाबदारी म्हणून आम्ही तरुणांनी एकत्र येऊन हे काम पूर्ण केले. प्रशासनाने किमान अशा पवित्र जागेचे तरी भान ठेवावे.”
योजनेचा फज्जा की प्रशासकीय आळस?
एकीकडे सरकार स्वच्छ भारत आणि हागणदारी मुक्त गावांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
युवकांनी केलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असले, तरी ‘जे काम प्रशासनाचे होते, ते तरुणांना का करावे लागले?’ हा प्रश्न विचारला जात आहे.







