डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या सातारा जिल्हा महिला अध्यक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
सातारा प्रतिनिधी... कैलास कुंभार

सातारा: स्वर्गीय डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुषमा राजे घोरपडे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. डॉ.संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी आत्महत्येच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा आक्रमक झाल्या आहेत.
डॉ. संपदा मुंडे यांनी चौकशी समितीला दिलेल्या लेखी उत्तरात ज्या सर्वाधिकारी व कर्मचाऱ्यांचा उल्लेख केला आहे, त्या सर्वांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) रेकॉर्डिंग तपासण्यात यावे.
यावेळी बोलताना सातारा जिल्हा महिला अध्यक्ष काँग्रेस यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ही घडलेली गोष्ट अत्यंत निंदनीय आहे आणि त्यामुळे डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणे आवश्यक आहे. या घटनेचा सातारा महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षांनी सुरू केलेल्या या उपोषणामुळे प्रशासनावर या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे. या उपोषणासंदर्भात जिल्हा प्रशासनाची किंवा पोलिसांची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे






