गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांचा रूट मार्च! शहरातील प्रमुख बाजारपेठा व चौकांमध्ये पोलिसांची पाहणी;
कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ...

कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप
मोहोळ. श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरासह पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी मोहोळ पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ शहरातील बाजारपेठ परिसर तसेच प्रमुख चौकांमधून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.प्रमुख मार्गांवर पोलिसांची पाहणी
मोहोळ पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला रूट मार्च बस स्थानक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – नगरपरिषद कार्यालय – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक – गवत्या मारुती चौक – सराफ गल्ली – बागवान गल्ली – आदर्श चौक – बुधवार पेठ – पोलीस ठाणे या मार्गाने काढण्यात आला. तसेच मौजे शेटफळ परिसरातही पोलिसांकडून रूट मार्च व पाहणी करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, प्रमुख चौक, गणेश मंडळांचे परिसर तसेच संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून पोलिसांकडून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत १६७ सार्वजनिक गणेश मंडळे
मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत एकूण १६७ सार्वजनिक गणेश मंडळे असून, त्यापैकी ४६ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तर मोहोळ शहरात ३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दत्तक गणेश मंडळ’ योजनेतून पोलिसांचा थेट संपर्क
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘दत्तक गणेश मंडळ’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदारांना गणेश मंडळे दत्तक देण्यात आली आहेत.
दत्तक देण्यात आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार गणेशोत्सव काळात संबंधित मंडळांच्या संपर्कात राहणार असून, श्री गणेशाच्या महाआरतीच्या वेळी तसेच गणेश मंडळांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
ग्राम सुरक्षा दलातील युवकांनाही विशेष सूचना
गणेशोत्सव काळात रात्रीच्या वेळी सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी ग्राम सुरक्षा दलातील युवकांनी भेटी देऊन पाहणी करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. यामुळे मंडळांच्या ठिकाणी सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.
मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सर्व गावांना पोलिसांकडून भेटी देण्यात आल्या आहेत. मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या तसेच संभाव्य उपद्रवी व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
गणेशोत्सवासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
गणेशोत्सव काळात मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत ७ पोलीस अधिकारी, ५० पोलीस अंमलदार, ५० होमगार्ड कर्मचारी तसेच एक स्ट्रायकिंग फोर्स असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव राखत श्री गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गणेश मंडळांनी शासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.







