माळशिरस तालुक्यात घरफोडीचा पर्दाफाश: १.५५ लाखांच्या दागिन्यांसह दोन सराईत चोरटे अकलूज पोलिसांच्या जाळ्यात

सहसंपादक .महेश पांडवे 9511875416
माळशिरस / अकलूज:
मौजे इनामदार वस्ती (नेवरे, ता. माळशिरस) येथे बंद घर कुलूपबंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातील सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी अकलूज पोलिसांनी अत्यंत तप्तरतेने तपास करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र जयवंतराव इनामदार यांचे इनामदार वस्ती येथील घर बंद असताना चोरट्यांनी घरफोडी करून ऐवज पळवला होता. घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलिसांनी तपासाची चक्री वेगाने फिरवली. घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची अत्यंत सूक्ष्म पाहणी करून संशयितांचा माग काढण्यात आला. पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींचा सुगावा लागला आणि पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. सागर दिलकुश काळे (रा. जळोशी, ता. पंढरपूर)
२. आकाश उर्फ पपण्या चव्हाण (रा. पडस्थळ सांगवी, ता. पंढरपूर; मूळ रा. बागलकोट)
पोलीस पथकाची कामगिरी:
ही धडक कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद साठे, शिवकुमार मदभावी, राहुल ननवरे, बबलू गाडे, दत्तात्रय खरात, अनुराधा अडगळे, सोमनाथ माने, पंडित गवळी, तुकाराम माने, देशमुख आणि तुषार लवटे यांनी या तपासात मोलाची भूमिका बजावली. तसेच सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अजित सुरवसे व स्वप्नील जाधव यांनी तांत्रिक तपासात महत्त्वाची मदत केली.
अकलूज पोलिसांच्या या तत्पर कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून, आरोपींकडून अधिक मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.







