नागरिक हैराण! राऊत नगरमध्ये अकलूज नगर परिषदेच्या संथ कामामुळे रस्ते उखडले; ‘पवार ॲक्वा’ची गाडी रुतली
नगराध्यक्ष व दोन नगरसेवकांच्या प्रभागामध्ये नागरिकांचे हाल

प्रतिनिधी विलास पवार
अकलूज (प्रतिनिधी):
अकलूज नगर परिषद प्रशासनाचा कारभार आणि ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे राऊत नगर, प्रभाग क्रमांक १ मधील नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत. आवाड किराणा दुकाना समोरील निरा माय परिसरात नगर परिषदेच्या वतीने रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, संपूर्ण रस्ता उकरून ठेवल्यामुळे आणि कामाचा वेग अत्यंत मंद असल्यामुळे या भागातील नागरिकांना रोजच मोठ्या हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

प्रशासकीय दिरंगाईचा फटका दररोज वाहतुकीला बसत असून आज या निष्काळजीपणाचे जीवंत उदाहरण समोर आले. या उखडलेल्या रस्त्यावरून जात असताना ‘पवार ॲक्वा’ कंपनीची ‘छोटा हत्ती’ ही पिण्याच्या पाण्याची गाडी चिखल आणि खड्ड्यांमध्ये पूर्णपणे रुतून बसली. वाहन जागेवरून हलेनासे झाल्याने वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार प्रभाग क्रमांक १ मध्ये घडत असून, याच प्रभागात सन्माननीय नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवक राहतात. लोकप्रतिनिधींच्याच प्रभागात जर विकासाच्या नावाने अशी दुरवस्था झाली असेल, तर नगर परिषदेच्या उर्वरित भागातील कामांचा दर्जा काय असेल, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, अन्यथा नगर परिषदेच्या या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राऊत नगर परिसरातील नागरिकांनी दिला आहे.







