आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर शस्त्र तस्करीचा अकलूज पोलिसांकडून पर्दाफाश; १७ पिस्तुलांसह १८.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

सहसंपादक .महेश पांडवे 9511875416
टेंभुर्णी (विशेष प्रतिनिधी):
बेकायदेशीर अग्निवस्त्रांची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी १७ देशी बनावटीची पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली आठ लाख रुपये किमतीची टाटा नेक्सन गाडी असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून अन्य दोन आरोपी फरार झाले आहेत.
पोलीस हवालदार श्रीराम पोरे यांना गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती की, विकास कैलास वजाळे (रा. परिते, ता. माढा) हा आपल्या टाटा नेक्सन कारमधून बेकायदेशीर बनावटीची पिस्तुले विक्री करण्यासाठी टेंभुर्णी-अकलूज रोडवरील ‘संगम’ परिसरात येणार आहे. या बातमीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी सापळा रचून संशयित वाहनाची पाहणी केली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पुढील चौकशीत या आंतरराष्ट्रीय तस्करीचा उलगडा झाला.
ही यशस्वी कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संतोष वाळके, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदमआणि त्यांच्या पथकाने केली आहे.

कारवाईत जप्त करण्यात आलेली शस्त्रे कुठे आणि कोणाला पुरवली जाणार होती, याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करत आहेत. फरार दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.







