मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंढरपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयास मंजुरी; आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंढरपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयास मंजुरी; आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याल यश..
महाराष्ट्र कार्यकारी संपादकदादासाहेब जगताप
पंढरपूर. येथे नवीन अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, पंढरपूर हे देशभरातील लाखो वारकऱ्यांचे आणि भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. दरवर्षी आषाढी, कार्तिकी तसेच इतर यात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापन करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाची आवश्यकता होती. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने या कार्यालयास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्रामध्ये आमदार समाधान आवताडे यांनी या महत्त्वपूर्ण विषयासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक करत, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दाखविलेल्या तळमळीचाही उल्लेख केला आहे.या निर्णयामुळे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस तसेच परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम, जलद व परिणामकारक पोलीस सेवा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः वारकरी संप्रदाय, भाविक, स्थानिक नागरिक तसेच यात्रांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या कार्यालयाचा मोठा फायदा होणार आहे.या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, पंढरपूरच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम होऊन भाविकांना सुरक्षित व सुकर दर्शन व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







