ताज्या घडामोडी

मोहोळ पोलिस ॲक्शन मोडवर रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे दुकानांचे बोर्ड हटवा, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई

सिंघम .अधिकारी PI. दीपक पाटील यांचा इशारा

महाराष्ट्र कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप

 

मोहोळ. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या पद्धतीने लावण्यात आलेले दुकानांचे डिजिटल बोर्ड, फ्लेक्स व जाहिरात फलक हटविण्यासाठी मोहोळ पोलिसांनी विशेष धडक मोहीम सुरू केली आहे. नागरिक व वाहनधारकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही कारवाई करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना थेट कायदेशीर नोटीस बजावण्यात येत आहे. भविष्यातही नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
मोहोळ शहरातील अनेक व्यापारी व दुकानदारांनी रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण करून धोकादायक पद्धतीने जाहिरात फलक व दुकानांचे बोर्ड उभारले होते. त्यामुळे वाहनांच्या सुरळीत वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वारंवार वाहतूक कोंडी तसेच अपघाताचा धोका वाढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी पंढरपूर रोड, हॉटेल लोकसेवा परिसर ते जुना टोल नाका या मार्गावर विशेष मोहीम राबवत रहदारीस अडथळा ठरणारे अनेक बोर्ड व फलक हटविले. तसेच शहरातील इतर भागांमध्येही अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले की, “नागरिकांची सुरक्षितता, सुरळीत वाहतूक आणि अपघातमुक्त मोहोळ हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यापुढे रस्त्यावर किंवा पदपथांवर रहदारीस अडथळा निर्माण करणारे बोर्ड अथवा जाहिरात फलक लावल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे.”

मोहोळ पोलीस ठाणे निरीक्षक दीपक पाटील.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.