मोहोळ मध्ये शिस्त लागू आता शहरात रिक्षाचालकांना गणवेश अनिवार्य; वाहतुक कोंडीवर सर्जिकल स्ट्राइक
वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या स्टॉल धारकावर कारवाई होणार

महाराष्ट्र कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप
मोहोळ.
आज दि. 28 जुलै 2026 रोजी मोहोळ पोलीस ठाणे येथे शहरातील हार-फूल विक्रेते, फेरीवाले, हातगाडी व्यावसायिक तसेच रिक्षाचालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे आणि रस्त्यावरील अतिक्रमणाला आळा बसावा, या उद्देशाने विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, कोणत्याही व्यक्तीने रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे किंवा वाहतुकीस व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने स्टॉल, हातगाडी अथवा व्यवसाय उभारू नये. मोहोळ शहरात संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. विशेषतः पंढरपूर रोड, मेन रोड, सोलापूर रोड, कुरुल ब्रिज तसेच एसटी स्टँडलगतचा परिसर येथे वाहतुकीची मोठी गर्दी होत असल्याने या ठिकाणी धोकादायक पद्धतीने उभ्या करण्यात आलेल्या हातगाड्या व स्टॉलमुळे अपघाताची शक्यता वाढत असल्याचे सांगण्यात आले.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले की, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे स्टॉल अथवा हातगाड्या आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
बैठकीत उपस्थित सर्व रिक्षाचालकांना सात दिवसांच्या आत गणवेशाचा वापर अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आले. यापुढे कोणताही रिक्षाचालक विनागणवेश रिक्षा चालवताना आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.याशिवाय रिक्षाचालकांना खालील सूचनाही देण्यात आल्या—
प्रवाशांकडून ठरलेल्या दरापेक्षा जास्त भाडे आकारू नये.रिक्षा शिस्तबद्ध पद्धतीने पार्क कराव्यात.रिक्षांमुळे वाहतुकीस किंवा विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये घेऊ नयेत.सर्व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.
ही बैठक मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीला मोहोळ शहरातील रिक्षाचालक, हार-फूल विक्रेते, फेरीवाले तसेच वाहतूक शाखेचे श्री सिद्धेश्वर बाबर, श्री दराडे आणि श्री संजय नेमाजी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने शहरातील सर्व व्यावसायिक आणि रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून मोहोळ शहराची वाहतूक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.







