मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत; वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्र. कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप
मोहोळ.
श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान, श्री क्षेत्र कौंडण्यपुर (जि. अमरावती) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या पवित्र पालखी सोहळ्याचे सोमवार, दि. 20 जुलै 2026 रोजी मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
दुपारी सुमारे 3.00 वाजता शेटफळ येथे पालखीचे मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगमन झाले. त्यानंतर सुमारे 4.00 वाजता पालखीने आपल्या निर्धारित वेळेनुसार मोहोळ परिसरात प्रवेश केला. यावेळी मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी पालखी प्रमुख श्री. सुरेश चव्हाण, श्री. सदानंद साधू, संस्थानचे विश्वस्त तसेच उपस्थित वारकरी बांधवांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. पोलीस प्रशासनाने वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला सलाम करत त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
पालखी सोहळ्यादरम्यान हजारो वारकरी सहभागी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालखी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत राहावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.
याशिवाय, मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीस तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक, वाहनचालक आणि मालवाहतूक करणाऱ्यांनी प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोहोळ पोलीस प्रशासनाच्या या नियोजनामुळे पालखी सोहळा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असून वारकरी बांधवांकडूनही पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.







