ताज्या घडामोडी

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

जनहक्क क्रांती मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

उपसंपादक. कैलास कुंभार

सातारा.
ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या कार्याचा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धारसातारा, दि.1.9.26
सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या कार्याची माहिती भावीपिढ्यांपर्यंतपोहोचविण्यासाठी चले जाव चळवळ स्मारक व क्रांती स्मारक परिसराचासर्वांगीण विकास व सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी जनहक्क क्रांती मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक न्याय आणि राष्ट्रहितासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य हुतात्म्यांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. मात्र या हुतात्म्यांचे कार्य केवळ इतिहासाच्या पुस्तकांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष जनतेसमोर यावे आणि नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने मंचने विविध मागण्या केल्या आहेत.
निवेदनात सातारा जिल्ह्यातील सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांची नावे, जन्मस्थळ, कार्यक्षेत्र, स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, केलेले कार्य, संघर्ष व बलिदान यांची संक्षिप्त व प्रमाणित माहिती देणारे कायमस्वरूपी माहिती फलक उभारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या निवडक हुतात्म्यांच्या कार्याची माहिती देणारे फलकहीउभारावेत.
विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास समजावा यासाठी इतिहासाधारित माहिती फलक, फोटो गॅलरी अथवा कायमस्वरूपी माहिती पॅनेल उभारण्यात यावेत. क्रांतिसिंह नाना पाटील तसेच प्रतिसरकारच्या ऐतिहासिक योगदानाची स्वतंत्रपणे सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
स्मारक परिसरात स्वच्छता, पायवाटा, विद्युत व्यवस्था, प्रकाशयोजना, वृक्षसंवर्धन, बैठक व्यवस्था आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन परिसराचा विकास करण्यात यावा. हा परिसर विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, इतिहास अभ्यासकांसाठी तसेच नागरिकांसाठी प्रेरणादायी ऐतिहासिक स्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरवर्षी हुतात्मा दिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व अन्य राष्ट्रीय दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र स्मारकाचा उपयोग केवळ एका दिवसापुरता न राहता तो स्वातंत्र्यलढ्याचा जिवंत इतिहास आणि प्रेरणास्थळ म्हणून विकसित व्हावा, अशी भूमिका जनहक्क क्रांती मंचने मांडली आहे.
या संपूर्ण कामासाठी आवश्यक शासकीय निधी उपलब्ध करून देऊन नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आलीआहे.
“हुतात्म्यांचा इतिहास जपणे म्हणजे केवळ स्मारक जपणे नव्हे, तर त्यांच्या विचारांचा आणि त्यागाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे होय. यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा,” अशी भूमिका जनहक्क क्रांती मंचने व्यक्त केली आहे.
या निवेदनावर श्री. शिवाजी जाधव, श्री. सुशांत मोरे, श्री. महारुद्र तिकुंडे, अॅड. मंगेश महामुलकर, श्री. कैलास कुंभार श्री हनुमंत शिंदे श्री रामचंद्र शिंदे श्री एकनाथ सपकाळ श्री कपिल राऊत श्री गणपत धनावडे व श्री. भरत रावळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत संबंधित अधिकाऱ्यांकडेही देण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.