बाहेरगावी जाताना नागरिकांनी मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा!संशयित व्यक्तींची माहिती पोलिसांना द्या : पोलीस निरीक्षक दीपक पाटील.

महाराष्ट्र कार्यकारी संपादक.दादासाहेब जगताप
मोहोळ .तालुक्यात घरफोडी तसेच मालमत्तेविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी घर बंद करून बाहेरगावी जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले आहे. घर बंद करून बाहेरगावी जाण्यापूर्वी घरातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. शक्य असल्यास मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये किंवा विश्वासू नातेवाईकांकडे सुरक्षित ठेवाव्यात. घर अनेक दिवस बंद राहणार असल्यास त्याची माहिती विश्वासू शेजाऱ्यांना द्यावी. घराच्या परिसरात अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तींची ये-जा आढळल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.संशयित व्यक्ती आढळल्यास स्वतःहून कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधावा. शक्य असल्यास संशयित व्यक्तीचे छायाचित्र, वाहनाचा क्रमांक किंवा इतर माहिती पोलिसांना देणे उपयुक्त ठरेल.रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्ती, संशयास्पद वाहन किंवा हालचाल आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील सुरक्षिततेबाबत जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करावे.सतर्क नागरिक–सुरक्षित समाज’ हा संदेश देत नागरिकांनी घरफोडी व मालमत्तेविषयक गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आपल्या परिसरातील संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना वेळीच माहिती दिल्यास संभाव्य गुन्हे रोखण्यास मोठी मदत होऊ शकते. पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचे नागरिकांना आवाहन
“बाहेरगावी जाताना घराची व मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता सुनिश्चित करा. परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या आणि सुरक्षित समाज निर्मितीसाठी पोलिसांना सहकार्य करा.”







