मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांची सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांना विशेष भेट; महत्त्वाच्या जनहिताच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा

महाराष्ट्र कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी काल सामाजिक कार्यकर्ते मा. प्रफुल्ल कदम यांना मुख्यमंत्री कार्यालयात विशेष वेळ देऊन त्यांच्या विविध जनहिताच्या आणि पाणी व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वपूर्ण मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री यांचा अत्यंत व्यस्त दौरा आणि बैठका असूनही त्यांनी प्रफुल्ल कदम यांच्याशी शांतपणे संवाद साधत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी प्रफुल्ल कदम यांनी राज्यातील पाणी प्रश्न, जलसंपदा व्यवस्थापन, शाश्वत जलवापर तसेच भविष्यातील पाणी नियोजन यासंदर्भातील विविध मुद्दे मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडले. राज्यातील नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळावा, जलसंधारणाच्या उपाययोजना अधिक प्रभावी व्हाव्यात आणि पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी शासनाने आणखी ठोस पावले उचलावीत, अशा विविध जनहिताच्या मागण्याही त्यांनी मांडल्या.
या प्रसंगी प्रफुल्ल कदम यांनी “This is our water” हे जलसंवर्धन आणि पाणी व्यवस्थापन विषयावर आधारित पुस्तक मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना भेट स्वरूपात प्रदान केले. पुस्तक स्वीकारताना मुख्यमंत्री यांनी त्याचे कौतुक केले तसेच पाणी संवर्धनाबाबत जनजागृती होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केल्याचे समजते.
मुख्यमंत्री कार्यालयातील ही भेट अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली. प्रचंड गर्दी, बैठका आणि विविध प्रशासकीय कामांचा व्याप असतानाही मुख्यमंत्री यांनी प्रफुल्ल कदम यांना वेळ दिल्याने त्यांच्या कार्याची दखल घेतल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि शासन यांच्यात सातत्याने संवाद होणे आवश्यक असून अशा बैठकीतून जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्याचा मार्ग अधिक सुकर होतो, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री आणि प्रफुल्ल कदम यांच्यात झालेल्या या चर्चेमुळे पाणी व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि जनहिताच्या विविध विषयांवर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय होतील, अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे.







