श्री संत. मुक्ताई च्या मानाच्या पालखीचे मोहोळ नगरीत जल्लोषात स्वागत; २ ते २.५ हजार वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त.

महाराष्ट्र कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप
मोहोळ.
आषाढी वारी २०२६ निमित्त संत मुक्ताई महाराजांच्या मानाच्या पालखीचे आज दुपारी सुमारे १.०० वाजता मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत नियोजित वेळेनुसार आगमन झाले. पालखीचे आगमन होताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखी प्रमुख, विश्वस्त मंडळ तसेच वारकरी भाविकांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दिपक पाटील यांनी पालखी प्रमुख, विश्वस्त आणि वारकरी बांधवांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या
सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा वारसा असल्याचे सांगत वारकऱ्यांच्या सेवेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यानंतर मुक्ताई मानाची पालखी पुढील नियोजित प्रवासासाठी मार्गस्थ झाली असून आजचा मुक्काम मौजे आष्टी, ता. मोहोळ येथे आहे. पालखीचे दर्शन घेण्यासाठी तसेच स्वागतासाठी मार्गावर मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.यंदाच्या पालखी सोहळ्यात अंदाजे २,००० ते २,५०० वारकरी सहभागी झाले असून त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पालखी मार्ग, मुक्काम स्थळ, गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दक्षतेने कर्तव्य बजावत आहेत.पालखी मार्गावरील प्रत्येक संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक शाखा तसेच आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतत गस्त, गर्दी नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सुरक्षित व सुरळीत प्रवास करता यावा यासाठी पोलीस प्रशासनाचा विविध विभागांशी समन्वय सुरू असून आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे मुक्ताई मानाच्या पालखीचा प्रवास शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात सुरू असून वारकरी भाविकांनीही पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.







